‘एक हजार वगैरे… आणि ईडी… एवढ्या लांब आम्हा छोट्या माणसाला कशाला नेऊन घालता हो’

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात देवस्थानांच्या जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. याबाबतची तक्रार सक्तवसूली संचालनालयाकडे (ED) देण्यात आली असून त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि माजी आमदार भीमराव धोंडेे (Bhimrao Dhonde) यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी हा जमीन घोटाळा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, जो भाजप प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन राजकारण करत आहे. त्याच भाजपचे नेते राज्यात प्रभू रामांच्या मंदिराच्या जमिनी हडपत आहे, असा घणाघाती हल्लाही मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांच्या आरोपांना आता सुरेश धस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एक हजार कोटीच्या घोटाळ्याचे मलिक आकडे सांगत आहेत. माझी स्वत:ची प्रॉपर्टी चार कोटी रुपयांची आहे. माझी सर्व मालमत्ता मलिकांना देतो. मला पाच पन्नास द्या. माझ्यावरील कर्जपाणी फिटून जाईल. एक हजार वगैरे… आणि ईडी… एवढ्या लांब आम्हा छोट्या माणसाला कशाला नेऊन घालता हो. काहीही बोलायचं… कुठला तरी माणूस माहिती देतो त्याच्या आधारावर जबाबदार मंत्र्याने बोलावं यापेक्षा मोठं दुर्देव नाही. मलिकांना या पूर्वी अशाच बेताल आरोपांप्रकरणी माफी मागावी लागली आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करणं दुर्देव आहे. राजकारणात कोणाच्याही इज्जत घ्यायच्या आणि काहीही बोलायचं यापेक्षा दुसरं काही म्हणता येणार नाही, असं धस म्हणाले.