मोठी बातमी : एक दोन नव्हे तर तब्बल वीस माजी मंत्री, खासदार, आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

चंडीगड – पंजाब विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी, सुमारे 15 ते 20 नेते लवकरच भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये सामील होण्याची शक्यता आहे, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने रिपब्लिकने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाच्या छावणीत सामील होणाऱ्यांमध्ये राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार तसेच पंजाबी गायक आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे.

याशिवाय पंजाबचे अनेक माजी कॅबिनेट मंत्री, गायक आणि सेलिब्रिटी भाजपच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. शिवाय, असे देखील सांगितले जात आहे की सामील होणारे बहुतेक नेते यापूर्वी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल (एसएडी), आम आदमी पार्टी (आप) आणि राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसशी संलग्न होते. सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले की, चार गायकांसह हे सर्व लोक या आठवड्यातच पंजाबमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

एएनआयला सूत्रांनी सांगितले की राज्यातील ड्रग्ज आणि दहशतवाद यासारख्या अनेक मुद्द्यांवर लोकांच्या मनात राग आहे. शिवाय, ‘चांगली माणसे सत्तेत असली पाहिजेत’, जेणेकरून तरुणांना फायदा होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

यापूर्वी शिरोमणी अकाली दल (एसएडी) चे ज्येष्ठ नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी 1 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. सिरसा यांचे पक्षात स्वागत करताना, धर्मेंद्र प्रधान यांनी टिप्पणी केली की हा भाजपसाठी भाग्यवान दिवस आहे. गजेंद्रसिंग शेखावत यांनीही सिरसा यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.