सूर्याचा अर्धशतक झळकावल्यानंतरचा ‘सूर्यनमस्कार’ सोशल मीडियावर व्हायरल

कोलकाता – वेस्ट इंडिजविरुद्ध 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतही भारतानं 3-0 असा विजय मिळवत विक्रमी कामगिरी केली. कोलकाता इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पेलताना पाहुणा संघ 9 गडी बाद 167 धावा करु शकला. वेस्ट इंडिजविरुद्ध 50 षटकांची मालिकाही भारतानं 3-0 अशी जिंकली होती.

या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव, त्याने मधल्या फळीत येऊन झटपट फटके मारले आणि संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक ठोकले आणि त्याला सामना आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

या सामन्यातील सूर्यकुमार यादवचा सर्वात खास क्षण होता जेव्हा त्याने अर्धशतक झळकावल्यानंतर टीम इंडियाच्या डग-आऊटकडे पाहत सलामीची क्रिया केली. त्याचे हे फुटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्याच्या नावाशी जोडलेल्या ‘सूर्यनमस्कार’वर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 65 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्यात 1 चौकार आणि 7 उंच षटकारांचा समावेश होता. त्याने व्यंकटेश अय्यरच्या साथीने शेवटच्या 5 षटकांत 86 धावा जोडल्या आणि टीम इंडियाला कठीण प्रसंगातून बाहेर काढत विजयाची आशा दाखवली.