सुषमा अंधारे त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी, फर्निचर आणि सोफ्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागतात ?

बीड : बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी केला आहे. सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला.

अप्पासाहेब जाधव म्हणाले, सुषमा अंधारे या बीड जिल्ह्यात खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी, फर्निचर आणि सोफ्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. माझे जिल्हाप्रमुखपद देखील सुषमा अंधारे यांनी विक्रीला काढले आहे. मी पक्ष वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काडं केली. माझ्या लेकराबाळांच्या मुखातला घास काढून पक्षवाढीसाठी पैसे खर्च केले. पण सुषमा अंधारे यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सुषमा अंधारे आणि माझं भांडण झालं, तेव्हा मी सुषमा अंधारे यांच्या दोन चापटा लगावल्या, असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला होता.

दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर, या यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. आप्पासाहेब जाधव यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळला असला तरी या प्रकाराची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.