बाळासाहेब आणि हिंदुत्वावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना प्रवेश दिल्याने होणार शिवसेनेची गोची ?

मुंबई – एकीकडे आमदार-खासदारांच्या बंडामुळे डॅमेज कंट्रोल भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुण्यात एका महिला नेत्याचं शिवसेनेत इनकमिंग झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) असं या महिला नेत्याचं नाव असून त्यांनी आता शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. सुषमा अंधारे या भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदारही आहेत, हे विशेष.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधारे या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे. अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झालं.

दरम्यान, अंधारे यांच्या पक्ष प्रवेशावरून शिवसेनेची खिल्ली उडवण्याची आणखी एक संधी विरोधकांना मिळाली आहे. कारण अंधारे यांनी अनेकदा शिवसेना, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, आणि परंपरांची खिल्ली उडवली आहे. एकीकडे शिवसेनेवर हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप होत असताना आता हिंदुत्वावर टीका करणाऱ्या अंधारे यांना प्रवेश दिल्याने आणखी पक्षाची गोची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोशल मिडीयावर शिवसेनेला आणखी ट्रोल केले जाऊ लागले आहे. सोबतच  अंधारे यांना नेमका प्रवेश देण्यामागे नेमका हेतू काय आहे हा देखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे.