टीम इंडियाचे देशांतर्गत सामन्यांचे  वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघासोबत खेळले जाणार सामने  ?

Indian Cricket Team Fixtures Schedule & Venue: BCCI ने देशांतर्गत हंगाम 2023-24 साठी सामन्यांचे वेळापत्रक आणि मैदानांची नावे जाहीर केली आहेत. या देशांतर्गत हंगामात भारतीय संघ 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. ज्यामध्ये 5 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 3 वनडे आणि 8 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. याशिवाय भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.

भारतीय संघ विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २४ आणि २७ सप्टेंबरला होणार आहे. याशिवाय मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे सामने होणार आहेत. त्याचबरोबर विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारत-अफगाणिस्तान मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. भारत-अफगाणिस्तान संघ या मालिकेत 3 टी-20 सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर यानंतर भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

विशेष म्हणजे २०२३ चा विश्वचषक भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ चेन्नईत आमनेसामने असतील.