राज ठाकरेंची महाराष्ट्रात सत्ता नाही हे त्यांचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं! अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं सूचक वक्तव्य

Raj Thackeray Birthday: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सैनिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच त्यांच्या घरापुढे गर्दी केली होती. अगदी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही राज ठाकरेंना दीर्घायुषी व्हा म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यातच अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत (Tejswini Pandit) हिनं देखील राज ठाकरेंना हटके स्वरुपात शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना तिनं मोठं राजकीय विधानंही केलं आहे.

तेजस्वीनीनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, “20 वर्ष झाली आपल्या परिचयाला ! पण संवाद कदाचित हल्लीच झाला. तुमचं खुप कौतुक वाटतं मला… स्वतःच्या हिंमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला. तो वाढवलात, वृधिंगत केलात. इतकी वर्षे पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंबप्रमुख बनून एवढी कुटुंबं जपलीत. स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत. राजकारणात मैत्री आणली नाही आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast lifeमध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात आणि आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलंत”

“हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात? राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे. कारण कर नाही त्याला डर कशाला! मुख्‍य म्‍हणजे तुमच्‍या जाणिवा अजूनही जिवंत आहेत”

“तुमच्‍या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं. राज ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे!! तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं यासाठी मी स्‍वामींची आभारी आहे”, अशा शब्दांत तेजस्वीनी पंडीत हीनं राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.