‘धर्मांध राजकारण करू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला’

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. सोबतच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठामपणे हिंदूंच्या बाजूने आपण उभे राहणार आहोत असे देखील संकेत दिले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला धुतल्यानंतर आता महाविकास आघातील तमाम नेते मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले आहेत. यातच आता नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धर्मांध राजकारण करू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आज आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला. असं म्हणत ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.