लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल मुळासकट उखडून फेकण्याची गरज : अतुल लोंढे

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर अशाच पद्धतीच्या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे आदेश देणारे त्यांचे ‘बिग बॉस’ कोण आहेत? याचाही शोध घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू यांच्यासह काही अधिकारी यांचे फोन २०१७-१८ साली बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. २०१९ सालीही राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन दोन महिने टॅप केल्याचे उघड झाले आहे. मुंबईच्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये रश्मी शुक्ला यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. फोन टॅपिंगचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून रश्मी शुक्ला यांनी आणखी कोणा-कोणाचे फोन टॅप केले आणि कोणाच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी हे बेकायदेशीर कृत्य केले हे उघड होणे गरजेचे आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची व्याप्ती व्यापक असल्याचे दिसते त्यासाठी तातडीने कारवाई करुन रश्मी शुक्ला यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

फोन टॅप करने हे व्यक्तीस्वातंत्र्यांचे उल्लंघन असून एखाद्या व्यक्तीवर अशापद्धतीने पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल लोकशाहीसाठी घातक आहे. तत्कालीन राज्य सरकारमधील मोठ्या पदांवरील व्यक्तींच्या आशिर्वादाशिवाय रश्मी शुक्ला एवढे धाडस करणार नाहीत असे वाटते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली तर रश्मी शुक्लांचा बीग बॉस कोण हेही महाराष्ट्राला कळेल व या संपूर्ण प्रकरणातील खरे चेहरे उघड होतील. लोकांवर बेकायदेशीरपणे पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल मुळासकट उखडून फेकण्याची गरज असून सरकारने यासाठी तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे असे लोंढे म्हणाले.