ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरील कारवाईचे पुढे काय झाले ? 

मुंबई – महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकार (Modi Government)विरोधात आवाज उचलला जातो, तेव्हा त्या विरोधकांना केंद्रीय यंत्रणांद्वारा समन्स देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आज होत असताना दिसत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर केला.

२०१९ मध्ये सुद्धा देशाचे नेते खा. शरद पवार  (Sharad Pawar)यांना अशा प्रकारचे समन्स पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते (Shivsena) संजय राऊत(Sanjay Raut), अनिल परब (Anil Parab)यांच्याप्रमाणेच देशाच्या इतर विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा समन्स पाठविण्यात आले होते, ज्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली होती अशी आठवण महेश तपासे यांनी करून दिली.

आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांना सुद्धा ईडीद्वारा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यासर्व गोष्टी लक्षात घेता, हा विरोधकांचा व देशातील सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न आज देशाच्या जनतेला पडलेला आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याच्या या प्रयत्नांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंडन करते. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर त्यांना भाजपमध्ये सामील केले गेले, त्यांच्यावरील कारवाईचे पुढे काय झाले? याचे उत्तर आज भाजपने द्यायला हवे असेही महेश तपासे म्हणाले.