‘शरद पवार यांच्या घरावर आज ज्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले ते अयोग्य, चुकीचे व असमर्थनीय आहे’

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

एसटीच्या विलीनीकरणात (ST workers) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) अडथळा आणल्याचा आरोप यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून या प्रकरणावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे.

कुणाच्याही घरावर आंदोलन करणे अयोग्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आज ज्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले ते अयोग्य, चुकीचे व असमर्थनीय आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. सदर घटना घडत असताना घराच्या परिसरात पोलीसांची संख्या कमी होती हे लक्षात आणून देत तात्काळ पोलीस बळ वाढवण्यात यावी अशी विनंती केली. दरम्यान,गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत.त्यांच्या मागण्या सरकारने योग्य पध्दतीने ऐकून घ्यायला हव्यात. त्यातून मार्ग काढणे अपेक्षित आहे,अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे.