या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; पवारांच्या घरावरील हल्ल्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

सातारा – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. दरम्यान, काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून यावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काय सांगायचं? माझ्याकडून काय अपेक्षित आहे. मी असं बोललं पाहिजे बरं झालं, चांगले केले. अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार आहे. कर्म असतं, जे आपण या जन्मी करतो तेच आपल्याला फेडावं लागते. हे माझ्यासह सर्वांनाच लागू आहे. यावर अजून काय बोलणार? असं भाष्य त्यांनी केले आहे.