राम मंदिराच्या नावावर आतापर्यंत जमा केलेल्या पैशाचा कुठलाही हिशोब लागत नाही – अतुल लोंढे

मुंबई – भाजपा हा कधी राम मंदिर बांधण्याचा नावाखाली जनतेकडून पैसे गोळा करते तर कधी विक्रांत बचावच्या नावाखाली पैसे गोळा करुन जनतेच्या भावनेशी खेळत आहे. या पैशांचा कसलाही हिशोब दिला जात नसून देवाच्या, धर्माच्या व राष्ट्रप्रेमाच्या नावावर जनतेची दिशाभूल करुन लुट केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रभक्तीच्या नावाखाली युद्धनौका आयएनएस विक्रांत बचाव (INS Vikrant) मोहिमेतून जनतेकडून पैसे वसूल केले. युद्धनौकेचे स्मारक उभारण्यासाठी जनतेकडून निधी गोळा केला परंतु त्या पैशाचे काय झाले याचे उत्तर जनतेला अनेक वर्ष मिळाले नाही. हे पैसे गोळा करुन त्यांनी पक्षाला दिले असे दोन दिवसापूर्वी समजले. म्हणजे युद्धनौकेच्या नावाखाली जनतेच्या भावनेशी सोमय्या यांनी खेळ करून जमा केलेल्या पैशाच्या अपहार केला.

अयोध्येत राम मंदिर (Ram mandir) उभारण्याच्या नावाखाली भाजपाने करोडो रुपये गोळा केला. रामाच्या नावावर पैसा गोळा करताना त्यातही अपहार करण्यात आला. रामाच्या नावावर किती पैसे जमा केले याचा सुद्धा कुठलाही हिशोब दिला नाही. रामाच्या नावावर जमा केलेले करोडो रुपये व सोने लुटल्याचा आरोप साधू-संतांनीच केला. राम मंदिराच्या नावावर आतापर्यंत जमा केलेल्या पैशाचा कुठलाही हिशोब लागत नाही. अयोध्येत मंदिर परिसरातील जमीन व्यवहारात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार भाजपा नेते व त्यांच्या समर्थकांनी केला आहे. धर्माच्या व देवाच्या नावावर भाजपा धंदा करत असून हा जनतेच्या भावनेशी केलेला खेळ आहे असेही लोंढे म्हणाले.