विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग केलेल्या कारच्या मालकाने पोलिसांकडे नोंदवला ‘हा’ जबाब   

Pune – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं नुकतेच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर पत्नी ज्योती मेटे यांच्यासह अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. यातच  शिवसंग्रामच्या (Shivsangram) बीडच्या पदाधिकाऱ्यांनी नवा खुलासा केला होता.

याआधीही त्यांच्यासोबत घातपाताचा प्रयत्न करणयात आला होता, असं शिवसंग्रामचे नेते अण्णासाहेब वायकर यांनी सांगितलं. तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात असताना शिक्रापुरच्या आसपास दोन गाड्यांनी पाठलाग केल्याचा दावा त्यांनी केल्याने या प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता  निर्माण झाली असताना आता या प्रकरणात आणखी एक वळण आले आहे.

हा पाठलाग केवळ गैरसमजातून झाल्याचं या गाडीच्या मालकाने पोलिसात सांगितलं आहे. मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडीच्या मालकाची रांजणगाव पोलीसांनी चौकशी केली. या चौकशीत कार मालक संदिप वीरनं तो पाठलाग केवळ गैरसमजातून झाला असल्याचं पोलिससांना सांगितलं आहे, अशी माहिती रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे (Balawant Mandage) यांनी ही माहिती दिली आहे.

मेटेंच्या गाडीचा पाठलाग केलेली गाडी रांजणगाव पोलीस हद्दीतली होती. त्यामुळे बातम्या पाहिल्यानंतर त्या कारचा मालक आणि त्यादिवशी गाडीत असणारे लोक स्वत:हून पोलीस स्टेशनला आले. तेव्हा त्यांचे जबाब नोंदवले. तेव्हा कार मालक संदीप वीर यांनी सांगितलं की, त्यादिवशी माझ्या चुलत भावाचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही शिरुरला गेलो. पण काही मित्रांनी आग्रह केला की तुम्ही परत घरी या त्यामुळे आम्ही घाई घाईने परत निघालो. स्पीडमध्ये आम्ही येत होतो. काही गाड्यांना ओव्हरटॅक केलं. हॉर्न वाजवले म्हणून त्यांचा गैरसमज झालेला असू शकतो की आम्ही पाठलाग केला. पण आम्ही ते जाणून बुजून केलं नाही. तर ते अनावधानाने झालं, अशी माहिती रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली आहे.