औरंगाबादचा ‘हा’ तरुण म्हणतो, मला प्रभारी मुख्यमंत्री करा; थेट राष्ट्रपतींना केला ई-मेल

औरंगाबाद  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना औरंगाबाद येथील तरुण भारत आसाराम फुलारे यांनी आपल्याला मुख्यमंत्री करण्याची केवळ मागणीच केली नाही तर त्याने यासाठी सनदशीर आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. या पठ्ठयाने आपल्या मागणीसाठी चक्क राष्ट्रपतींना ई-मेल पाठविला आहे.

फुलारे यांचा स्वतःचा राजकीय पक्ष ही आहे.  त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव डावात मचाळा पार्टी असं आहे. सध्या सुरु असलेल्या राजकारणात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना कोणीच वाचा फोडत नसल्याने आणि त्यांचा प्रश्न आणि समस्या सोडण्यासाठी कोणीच पुढं येत नसल्याने जनता हतबल झाल्याचे सांगितले. जोपर्यंत राज्यातील राजकारण स्थिर स्थावर होत नाही. राजकीय गटबाजी शमत नाही. तोपर्यंत जनतेच्या हितासाठी आपल्याकडे सत्ता सोपवावी आणि आपल्याला मुख्यमंत्री पदाचा प्रभारी पदभार सोपवावा अशी मागणी या तरुणाने  केली आहे. ई-मेल द्वारे यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतींना साकडे घातले आहे.