अनिल अंबानींची ही प्रसिद्ध कंपनी विकली जाणार, 19 डिसेंबरला होणार ई-लिलाव

Mumbai – देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांची कर्जात अडकलेली आणखी एक कंपनी आता विकली जाणार आहे. एकेकाळी देशातील सर्वात मोठी वित्त कंपनी असलेल्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (RCL) ला कर्ज देणाऱ्यांनी कंपनीसाठी बोली लावणाऱ्या बोलीदारांसाठी ई-लिलाव आयोजित करण्यासंबंधीचे नियम आणि प्रक्रिया जवळजवळ अंतिम केली आहेत. आरसीएलच्या मालमत्तेचा ई-लिलाव 19 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लिलावाची मूळ किंमत 5,300 कोटी रुपये असेल. कॉस्मिया-पिरामल युतीने ही बोली लावली होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत बोली लावणाऱ्यांना मूळ किमतीपेक्षा जास्त बोली लावावी लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी कंपनीचा ई-लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एलआयसी आणि ईपीएफओच्या विनंतीवरून वाढीव बिडसह ई-लिलाव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कर्जदारांच्या समितीमध्ये या दोन सरकारी-नियंत्रित युनिट्सचे एकत्रित नियंत्रण 35 टक्के आहे. आरसीएलला संपूर्ण कंपनीसाठी चार बंधनकारक बोली प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय ऑक्ट्री, हिंदुजा आणि टोरेंट ग्रुपनेही बोली लावली होती.

नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) म्हणून कार्यरत असलेल्या रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिझव्र्ह  बँकेने हटवले होते, नागेश्वर राव वाय यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दिवाळखोरी संहितेअंतर्गत लिलावासाठी जाणारी RCL ही तिसरी NBFC आहे. याआधी स्रेई ग्रुप आणि डीएचएफएलचा लिलाव झाला आहे.