मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना आवाहन

Mumbai – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले.

मुंबईतील गटनेत्यांच्या या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व कळतंय, मराठी – हिंदू सोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्या सोबत आहेत. तुमचे चेले-चपाटे इकडे जे बसले आहेत त्यांना सांगा मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा आणि त्यासोबतच विधानसभेची देखील निवडणूक लावून दाखवा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी अमित शाह ना आवाहन देतोय, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाही तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. कुस्ती आम्हांलाही येते, तीच आमची परंपरा आहे. पाहू कोण कुणाच्या पाठीला माती लावतो.असं ते म्हणाले.