“सापाच्या पिलाला ३० वर्ष दूध पाजलं, आता ते…” मुख्यमंत्र्यांचा भाजपावर प्रहार 

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी उशिरा सत्ताधारी पक्षाच्या झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर तोफ डागली आहे. “३० वर्ष सापाच्या पिलाला दूध पाजलं, ते वळवळ करत होतं, आता आमच्यावरच फुत्कारतंय”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाला फटकारले आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या देशात एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही तुम्ही? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीमध्ये बोलताना उपस्थित केला आहे.

सध्या धाडी पडत आहेत. याला-त्याला अटक केली जात आहे. पण आता हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही कुणावर वार करत नाही, पण कुणी केला, तर त्याला आम्ही सोडणार नाही. आपली एकजूटच आपली ताकद आहे. तुम्ही सरकार पाडणार वगैरे म्हणताय. माझे १७० मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.