दाऊदच्या दलाल मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी भाजपाकडून पाय-यावर आंदोलन केलं जात आहे. नवाब मलिक हाय हाय, दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिकचा राजीनामा झाला पाहिजे, अशा जोरदार घोषणा भाजपकडून देण्यात आल्या.

तर, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे. काल दोन्ही बाजूंकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली. या बैठकीत भाजपनं अधिवेशनाची रणनीती आखली असून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.