“देवेंद्रजी, तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले…”, उद्धव ठाकरे यांचा गर्भित इशारा

Patna: बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी भाजपविरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत 17 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. अगदी शिवसेना उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही (Aditya Thackeray) या बैठकीला आले होते. या बैठकीवरुन उद्धव ठाकरेंवर टीका करताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी परिवाराचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला.

मी परिवाराबाबत संवेदशनील आहे. सूरज आणि शिवसैनिक माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असं सांगतानाच सूरजवर धाड टाकली. तो साधा शिवसैनिक आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.