World Cup 2023 : चेन्नईत खेळायला पाकिस्तान घाबरतंय? अश्विन म्हणाला, “मला शंका आहे की…”

यावर्षी एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) भारतात खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. मात्र, बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला आहे. त्याचवेळी, आयसीसी सध्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या संमतीची वाट पाहत आहे. ड्राफ्ट शेड्यूल पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी)ही नाखुषी सुरू केली आहे. पीसीबीने आयसीसी आणि बीसीसीआयकडे आपल्या दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली आहे. या मागणीवरून भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पाकिस्तान क्रिकेटवर (PCB) निशाणा साधला आहे.

आयसीसीने विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व देशांना वेळापत्रकाचा मसुदा पाठवला आहे. या वेळापत्रकानुसार, पाकिस्तान 20 ऑक्टोबरला बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. ही दोन्ही ठिकाणे बदलण्याची मागणी पीसीबीने केली आहे. पीसीबीने याचे कोणतेही कारण दिलेले नाही.

मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानला प्रत्येक सामन्यात फेव्हरिट टीम म्हणून प्रवेश करायचा आहे. त्यांना ऑस्ट्रेलियाविरोधात चिन्नास्वामी आणि अफगाणिस्तानविरोधात चेपॉकवर खेळण्याची भीती वाटतेय. कारण चिन्नास्वामी हा हाय स्कोरिंग खेळपट्टी आहे, तर चेपॉक फिरकीपटूंना मदत करते. अफगाणिस्तानकडे राशिद खान आणि मुजीब उर रहमानसारखे फिरकी गोलंदाज आहेत.

दरम्यान, भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन म्हणाला की, ‘पाकिस्तानने आपल्या पत्रात लिहिले आहे की अफगाणिस्तानसाठी चेन्नईतील परिस्थिती अनुकूल आहे. जर हा सामना बंगळुरूमध्ये खेळवला तर पाकिस्तानला फायदा होईल.’

अश्विन पुढे म्हणाला, ‘आयसीसी या विनंतीवर लक्ष देईल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. पाकिस्तान जर कोणतं वैध कारण देत असते तर व्हेन्यू बदलण्याची शक्यता असती. विशेष म्हणजे फक्त सुरक्षेच्या कारणास्तवच आयसीसी अशा प्रकारच्या विनंतीवर लक्ष देते. 2016 मधील टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील धर्मशाळा येथील सामना कोलकाता येथे शिफ्ट करण्यात आला होता.’