“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

Sunil Tatkare: महाराष्ट्रात मजबूतीने पक्षाला उभे करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असून अजितदादांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखालील गुरुवारी होणारे विचार शिबीर हे देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जत येथील निर्धार सभेत व्यक्त केला.

ही केवळ राष्ट्रवादीची सभा आहे आणि श्रीवर्धनला झाली ती तीन पक्षांची होती असा टोला लगावतानाच तुम्ही आज जो निर्धार दाखवला त्याबद्दल कर्जत खालापूरवासियांना सुनिल तटकरे यांनी धन्यवाद दिले.

दादा तुम्ही काम केले नसते तर आज ४३ आमदारांची ताकद आपल्या पाठीशी उभे राहिले नसती असा टोलाही अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेवर सुनिल तटकरे यांनी लगावला.

धर्मनिरपेक्ष विचार घेऊन आम्ही स्वच्छ भूमिका घेतली आहे. आम्हाला विकसित महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला सामोरे जायचे आहे. आरक्षणापासून मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळासाठी जो निधी देऊन सर्वधर्मसमभाव ठेवून महायुतीच्या माध्यमातून काम करत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

जो निर्णय घेतला आहात त्यापाठीशी राज्यातील जनता उभी राहिली आहे. या मतदारसंघात उरलेल्या मतदारसंघापेक्षा हा पुढे असेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

१९८४ मध्ये युवक अध्यक्ष म्हणून आलो होतो. ४० वर्षात जे घडले नाही ते आज कर्जतवासियांनी करुन दाखवले हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे आदींनी आपले विचार मांडले.  कर्जत – खालापूरच्या सर्वांगिण विकासाची जाहीर निर्धार सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतच्या पोलीस मैदानावर पार पडली.

‘घड्याळ तेच वेळ नवी’ ! ‘निर्धार नवपर्वाचा’ हे घोषवाक्य आज कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसची ही जाहीर सभा झाली. याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर भव्य रॅलीने अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे,जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, प्रदेश सचिव उल्हास भुर्के, दत्तात्रय मसुरकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-