अर्ध्यावर साथ सुटली विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्यांचा दिंडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) समस्त वारकरी संप्रदाय विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारीने पंढपूरला जाण्यासाठी निघाला आहे. पुण्यातील आळंदी येथून नुकतीच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक या वारीत सहभागी झाले आहेत. मात्र या आनंदोत्वसातच एक दुख:द बातमी समोर आली आहे.

माशेलहून श्री क्षेत्र पंढरपूर येथे निघालेल्या श्री देवकीकृष्ण मंडळातील वारकरी सीताकांत दशरथ भोसले (वय ६६) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बुधवारी सकाळी पाटणे (जि. चंदगड, महाराष्ट्र) येथे ही दुर्दैवी घटना घडली.

सीताकांत हे इंडियन ओव्हरसीस बँकेचे निवृत्त अधिकारी होते. ते उत्साही भजनी कलाकार तसेच उत्कृष्ट पखवाज वादक होते. जिथे भजन तिथे सीताकांत असे समीकरणच होते. भजनाच्या माध्यमातून त्यांचे विठ्ठलाशी नाते जोडले गेले होते. सीताकांत यांच्या निधनाने माशेलहून निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, दुपारी सीताकांत यांचे पार्थिव खांडोळा येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या जन्मभूमी आखाडा सांतइस्तेव येथून अंतिम संस्कारासाठी नार्वे येथे नेण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे.