वरुण सरदेसाई यांची हकालपट्टी करत शिंदेंनी युवसेनेच्या सचिवपदी सर्वसामान्य शिवसैनिकाला बसवलं 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी पुणे शहर व जिल्हातील हजारो कार्यकर्ताच्या उपस्थीतीत मेळावा पार पडला. या मेळाव्यास एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेमधील बंडाळी नंतर पुणे जिल्हा व शहर शिवसेनेला देखील मोठे खिंडार पडले आहे. यावेळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे  माजी मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे (Uday Samant, Vijay Shivatare) तसेच आमदार भरतशेठ गोगावले, संजय शिरसाठ,  प्रकाश सुर्वे, बालाजी कोनाक्री, रविंद्र फाटक (Bharatsheth Gogavle, Sanjay Shirasath, Prakash Surve, Balaji Conakry, Ravindra Phatak) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या वेळी मेळाव्यात शिवसेनातील अनेक पदाधीकार्‍यांनी जाहीर समर्थन दिले.

यावेळी मुख्यमंत्री यांनी रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी, अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय याप्रसंगी जाहीर केला. दरम्यान, हा निर्णय जाहीर करताना शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

किरण साळी हे निष्ठावंत आणि झुंजार कार्यकर्ते आहे. वरुण सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिंद गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.