शॉकिंग! बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप

नवी दिल्ली- यंदाची महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. महाराष्ट्र केसरीचे ६३ वे पर्व संपून आठवडाही होत नाही, तोपर्यंत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविषयी धक्कादायक बातमी पुढे येत आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू आज दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलनास बसल्या. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडू बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

“राष्ट्रीय शिबीरात महिला पैलवानांवर प्रशिक्षकांकडून लैंगिक अत्याचार होत आले आहेत. यामध्ये अध्यक्ष बृजभूषण सिंग यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय शिबीरातील काही प्रशिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून महिला पैलवानांचं शोषण करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्षही यात सहभागी आहेत”, असा धक्कादायक आरोप राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती मल्ल विनेश फोगाटने केला आहे.

कित्येक तरुण महिला कुस्तीपटूंनी याबद्दल माझ्याकडे तक्रार केली आहे. राष्ट्रीय शिबीरात आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगताना या महिला खेळाडू माझ्याकडे रडत होत्या. राष्ट्रीय शिबीरात ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे अशा किमान २० मुलींना मी ओळखत असल्याचं विनेश फोगाटने यावेळी सांगितलं.

मी आज याबद्दल बोलत आहे, मला माहिती नाही की मी उद्या जिवंत असेन की नाही. कारण कुस्ती महासंघातली लोकं खूप ताकदवान आहेत. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्याजवळ असलेले पुरावे हायकोर्टात सादर करण्यास तयार असल्याचंही विनेश फोगाटने यावेळी सांगितलं.

यादरम्यान ऑलिम्पिक पदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या मल्लांनीही कुस्ती महासंघावर कारवाई करुन बदलाची मागणी केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या महासंघाऐवजी नवीन अधिकारी तिकडे येणं गरजेचं आहे. आम्ही याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी बोलण्यास तयार आहोत. या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं असल्याचं, साक्षी मलिकने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

यावेळी बजरंग पुनियानेही सर्व पीडित मुली या चांगल्या घरातून पुढे आल्या असल्याचं म्हणाला. “जर आमच्या बहिणी आणि मुली इकडे सुरक्षित नसतील तर आम्हाला हे मान्य नाही. त्यामुळे कुस्ती महासंघावर कारवाई होणं गरजेचं आहे.”