किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या नेत्यांचे आता काय होणार?

Kirit Somayya : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. (NCP split) राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली..(Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister.)

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, लोकांमध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याबद्दल चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात सोमय्या यांनी तपास यंत्रणांकडे तक्रार केली होती. ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांवर छापे मारले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

राष्ट्रवादीचे कागलमधील आमदार मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर अटकेवर टांगती तलवार आहे. त्याशिवाय, कोल्हापूर आणि मुंबईतही मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सोमय्या यांनी आरोप केलेले आमदार छगन भुजबळ यांनादेखील ईडीने अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. तर, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर देखील आरोप केले होते. आता ही मंडळी आता भाजपसोबत सत्तेत आहेत.आता केंद्रीय यंत्रणा या नेत्यांवर पुढे कशी कारवाई करणार हे येत्या काही दिवसात जनतेला दिसेल .