‘शेंबडा आदित्य जिथे जिथे गेला तिथे पक्ष बेकार हरला’

मुंबई : पुणे : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावून पाहिले होते. उत्तर प्रदेश आणि गोव्यातील काही जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीने लढवल्या होत्या मात्र या दोन्ही पक्षांच्या पदरी केवळ भोपळा मिळणार असल्याचे दिसत आहे. मोठा गाजावाजा करत शिवसेना नेत्यांनी अनेक गंभीर आरोप करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला मात्र मतदारांना हा केविलवाणा प्रयत्न लक्षात आल्याने या दोन्ही पक्षांना नाकारले असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये जंगी प्रचारसभाही घेतली होत्या. मात्र असं असलं तरी देखील शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीचे देखील असेच हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेनेच्या या कामगिरीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे याना चिमटा काढला आहे. ‘शेंबडा आदित्य जिथे जिथे गेला तिथे पक्ष बेकार हरला’ अशी खिल्ली निलेश राणे यांनी उडवली आहे.