कोण आहेत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद? राजकारणात आहेत सक्रिय

अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद (Fahad Ahmad) यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले (Swara Bhasker Wedding) आहे. स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. परंतु तिने काल (16 फेब्रुवारी) सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. स्वरा भास्कर कोण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण  स्वरा भास्करचे राजकारणी पतीदेव फहाद झिरार अहमद कोण आहे? ते काय करतात? सर्व काही जाणून घेऊ… (Who Is Fahad Ahmad)

कोण आहेत स्वरा भास्करचे पती फहाद अहमद?
स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस स्टुडंट युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. जुलै 2022 मध्ये, फहाद अहमद अबू असीम आझमी आणि रईस शेख यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात सामील झाले. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील युवाजन सभेचे आणि सपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्षपद आहे.

फहाद अहमद यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी बहेरी, यूपी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झिरार अहमद आहे. फहादने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पदवी आणि एम.फिल पदवी घेतली आहे. त्यानंतरच ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईशी सामाजिक कार्यकर्ते म्हणून जोडले गेले. 2017 आणि 2018 मध्ये, फहाद यांची TISS विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून निवड झाली. सध्या ते डॉक्टरेटही करत आहेत.

2017-2018 मध्ये, फहाद अहमद प्रथमच TISS विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर त्यांनी 1000 हून अधिक विद्यार्थ्यांसह एससी, एसटी आणि ओबीसींची फी माफी मागे घेण्याविरोधात आंदोलन केले. याशिवाय त्यांनी मुंबईतील सीएए विरोधी आंदोलनातही भाग घेतला आणि देशाच्या अनेक भागात मोर्चे काढले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष एस. रामादोराई यांच्या हातून एम.फिलची पदवी घेण्यास फहाद अहमद यांनी नकार दिला होता. यामुळे टाटा संस्थेने विद्यार्थ्यांना मंजुरी देण्यास नकार दिला होता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने फहाद अहमदला पीएच.डी.मध्ये नोंदणी करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर TISS ने एक निवेदन जारी केले होते की हा संस्थेचा अपमान आहे.