‘कार्यक्रम काय आहे, आपण काय बोलतोय हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला’

मुंबई – मुंबईत ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे (National Common Mobility Card)  लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने हिंदुत्व ( Hindutva ), हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa ) अशा विविध मुद्द्यांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.  विरोधकांवर सडकून टीका करतांना लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.

यावेळी विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ‘हिंदुत्व (Hindutva)  म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे.हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मळमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही..’असं ठाकरे म्हणाले.

आज राज्यात अनेकांना ऍसिडिटी झाली आहे. त्यांना मुंबईत झालेली कामे दाखवा. त्यांनी आपल्या सत्ता असलेल्या राज्यात किती ठिकाणी अशी दर्जेदार कामे केली, ते दाखवून द्यावे, असे खुले आव्हान  उद्धव ठाकरे यांनी विरोधकाना दिले आहे. बिन कामाच्या भोंग्यांना ( Loudspeaker controversy ) मी काडीची किंमत देत नाही, दादागिरी केली तर ती मोडून काढू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे ( BJP leader Nilesh Rane ) यांनी एक ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, काल मुख्यमंत्री BEST आयोजित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कार्यक्रमाला गेले आणि राजकीय बोलून निघाले. कार्यक्रम काय आहे आपण काय बोलतोय कसं बोलतोय हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला. विरोधकांवर टीका करण्यासाठी व्यासपीठ राजकीय असावं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे.