मनसेचं एक मत कुणाला मिळणार ? राज ठाकरे यांनी राजू पाटलांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA ) आणि भाजपमध्ये (BJP) सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत असून या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आपला विजय निश्चित व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून अपक्षांना तसेच छोट्या पक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत.

यातच आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असून या भेटीत राज्यसभा निवडणुकीत मनसे आपले मत भाजपला देणार असल्याचं ठरलं आहे. राज ठाकरे यांनी राजू पाटलांना तसे आदेश दिले आहेत. भाजपसाठी हे मत अत्यंत महत्वाचे असून या मतामुळे आमचा विजय सुकर होईल असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.