ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये रोहित शर्मा महत्त्वाचा का असेल? सलामीवीर म्हणून आश्चर्यकारक आकडेवारी पहा

WTC Final: भारतीय संघ 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा (World Test Championship 2023) अंतिम सामना (WTC Final) खेळणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अशा स्थितीत संघ यावेळी विजेतेपदासाठी जीवाचे रान करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कसोटी सलामीवीर म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) आकडेवारी प्रभावी आहे.

रोहित शर्मा हा भारतीय कर्णधार तसेच सलामीवीर आहे. अशा परिस्थितीत त्याची फलंदाजी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याचवेळी, रोहित शर्मा गेल्या चार वर्षांत कसोटी सलामीवीर म्हणून उत्कृष्ट लयीत दिसला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून अनेक धावांचा पाऊस पडला. या चार वर्षांत कसोटी सलामीवीर म्हणून खेळताना रोहित शर्माने 22 सामन्यांच्या 36 डावांत 52.76 च्या सरासरीने 1794 धावा केल्या आहेत.

यादरम्यान रोहित शर्माच्या बॅटमधून 6 शतके आणि 4 अर्धशतके झळकली आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे. दरम्यान, रोहित शर्माने 210 चौकार आणि 37 षटकार मारले. अशा परिस्थितीत रोहित शर्माचा फॉर्म ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC मध्ये खूप महत्त्वाचा असेल.
यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने 4 सामन्यांच्या 6 डावात 40.33 च्या सरासरीने 242 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून शतक झळकले. दरम्यान, रोहित शर्माने 26 चौकार आणि 5 षटकार मारले होते.  रोहित शर्माने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते, तेव्हापासून तो 49 कसोटी सामने खेळला आहे. या सामन्यांच्या 83 डावांमध्ये फलंदाजी करताना रोहितने 45.66 च्या सरासरीने 3379 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत.