ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावले जाणार का? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की…

जालना – ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कुठलेही निर्बंध लावले जाणार नाहीत असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. जालना इथं आयोजित पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते. विमानतळावर वेळोवेळी प्रवाशांची चाचणी सुरू असून पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले जात आहेत तसंच ओमिक्रॉन बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोधही सुरू आहे अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

जिनोमिक सिक्वेसिंगच्या राज्यात तीन प्रयोगशाळा आहेत. मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन औरंगाबाद आणि नागपूर इथं आणखी दोन प्रयोगशाळा सुरू करण्याची योजना असून लहान मुलांचं लसीकरण आणि वर्धित मात्रा अर्थात बुस्टर डोसबाबत केंद्रांनं निर्णय घेतल्यास राज्य त्याचं स्वागत करेल असंही टोपे यांनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान, राज्यात काल कोरोनाच्या 518 नवबाधितांची नोंद झाली; तर 811 रुग्ण या आजारातून बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या राज्यातल्या रुग्णांची एकंदर संख्या 64 लाख 87 हजार 593 झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 शतांश टक्के आहे. या आजारामुळे काल 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून,मृत्यू दर 2.12 टक्क्यांवर आहे.

राज्यात सध्या 6 हजार 853 रुग्ण उपचाराधीन असून सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. तर धुळे आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी 1 आणि नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यात फक्त 2 रुग्ण उपचार घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात सध्या एकही उपचाराधीन रुग्ण नाही.

 

 

 

You May Also Like