WPL Auction Live: भारताची धडाकेबाज सलामीवीर आरसीबीच्या ताफ्यात, चक्क ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

Mumbai: बहुप्रतिक्षित महिला आयपीएल २०२३ चा (WPL 2023) लिलाव मुंबईत दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयपीएल लिलाव (WPL Auction) होत आहे. मल्लिका सागर अडवाणी या लिलावकर्ता असून एकूण ४०९ खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले गेले आहे. त्यांपैकी केवळ ९० खेळाडूंना ५ फ्रँचायझींद्वारे विकत घेतले जाईल.

सर्वप्रथम भारतीय संघाची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधाना हिच्यावर बोली लावण्यात आली. स्म्रीती ५० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरली होती. तिला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर ३ कोटी आणि ४० लाख रुपयांना बेंगलोरने स्म्रीतीला (Smriti Madhana) विकत घेतले. 

दरम्यान लिलावात सहभागी झालेल्या ४०९ खेळाडूंपैकी २४६ भारतीय खेळाडू आणि १६३ परदेशी खेळाडू आहेत. सहयोगी देशांच्या ८ खेळाडू या लिलावाचा भाग आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा, स्म्रीति मंधाना आणि दीप्ती शर्मा या खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली आहे. महिला आयपीएलच्या पाचही संघांना किमान १५ खेळाडूंना संघात ठेवावे लागणार आहे. लिलावात फ्रँचायझीला १२ कोटींपैकी किमान ९ कोटी रुपये खर्च करावे लागतील. सर्व फ्रँचायझींना ६ परदेशी खेळाडू विकत घेण्याचा अधिकार असेल.