धर्मगुरू दलाई लामा यांचा वादग्रस्त व्हिडिओ, चौफेर टीकेनंतर माफी मागितली; जाणून घ्या प्रकरण

धर्मशाला  : तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र व्यक्ती मानल्या जाणार्‍या दलाई लामा (Dalai Lama) यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे (Dalai Lama Viral Video) खळबळ उडाली असून, त्यांना माफी मागण्यास प्रवृत्त केले आहे. दलाई लामांचा हा वादग्रस्त व्हिडिओ 28 फेब्रुवारीचा आहे ज्यात ते धर्मशाला येथील मॅक्लॉडगंज येथे एका कार्यक्रमात एका मुलाला ओठांवर चुंबन घेण्यास सांगत आहेत. वृत्तानुसार, ही घटना एका मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात घडली जिथे जवळपास 100 शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

दलाई लामा व्यासपीठावर शालेय विद्यार्थ्यांशी बोलत होते, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने दलाई लामा यांना मिठी मारता येईल का?, असे विचारले. यावेळी दलाई लामा यांनी विद्यार्थ्याला स्टेजवर बोलावले आणि सर्वांसमोर शाळकरी मुलाला ओठांवर चुंबन घेण्यास सांगितले. मुलाने त्यांचे चुंबन घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी त्याच्या या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर दलाई लामा यांनी या अनुचित वर्तनाबद्दल जाहीर माफी मागितली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दलाई लामा यांनी मुलाला बोलावून ओठांवर चुंबन घेतल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मुलगा दूर जाण्याचा प्रयत्न करत राहिला, तर दलाई लामा हसले आणि मुलाला मिठीत ओढले. तिथे उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.