‘100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा!’ चक्क आमदारालाच ऑफर आल्यानं खळबळ, चौघांना अटक 

मुंबई : मुंबईतून फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. ताज्या प्रकरणात, दौंड येथील भाजप आमदार राहुल कुल (BJP MLA Rahul Kul) यांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणी (Extortion) विरोधी कक्षाने चार जणांना अटक केली आहे. रियाझ शेख (41), योगेश कुलकर्णी (57), सागर संगवई (37) आणि जफर अहमद रशीद अहमद उस्मानी (53) अशी आरोपींची नावे आहेत.

राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले असून मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सध्या ‘नंदनवन’ आणि ‘सागर’ या शासकिय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चारही आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत, मंत्री महोदय यांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन तीन वेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्री मंडळात मंत्रीपद देण्यासाठी १०० कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर १७ जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली.

मंत्रीमंडळात सहभागासाठी नंतर ९० कोटी रुपये मागत असून त्यातील २० टक्के रक्कम म्हणजे १८ कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे आमदारांना सांगितले. आरोपीने सोमवारी नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले.

सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेखला हॉटेलमध्ये पोहोचताच ताब्यात घेण्यात आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कुल, त्यांचे पीए आणि भाजपचे दुसरे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) हॉटेलमध्ये उपस्थित होते. आम्ही तिथे वेश बदलून साध्या कपड्यात होतो… शेख येताच त्याला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान शेखने कुलकर्णी आणि संगवई यांच्या भूमिका उघड केल्या, ज्यांना सोमवारी रात्री ठाण्यातून अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी नागपाडा परिसरात सापळा रचला आणि मंगळवारी पहाटे उस्मानीलाही अटक करण्यात आली.