नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून कोल्हेंवर चौफेर टीका; राजेश टोपेंनी केले जनतेला ‘हे’ आवाहन

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकाबाजूला मंत्री जितेंद्र आव्हाड या कोल्हे यांच्या चित्रपटाला विरोध करत आहेत तर दुसऱ्या बाजूला मंत्री राजेश टोपे मात्र कोल्हे यांचा बचाव करताना दिसून आले .राजेश टोपे म्हणाले की, ‘Why I killed Gandhi’ हा साधारणपणे 45 मिनिटाचा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होतोय असं कळतंय. आजच अमोल कोल्हे माझ्याकडे तास दोन तास होते. त्यांच्या मनातील एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो ते पुण्यात करु पाहत आहेत, त्यबाबतची बैठक होती. त्यानंतर त्यांनी मला ती क्लिपही दाखवली ज्यात त्यांनी नथुराम गोडसेचा रोल केलेला आहे.
अमोल कोल्हे यांची ओळख ही एक अत्यंत चांगला, लोकप्रिय, गुणी अभिनेता म्हणून आहे. आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा असा गुणी कलाकार आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यांची संभाजी नावाची मालिका सुरु होती. त्यावेळी सर्वजण ती मालिका पाहत. एक अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यांनी नथुराम गोडसेचा रोल जरी केला असला तरी तो एक अभिनेता म्हणून त्याकडे पाहिलं जावं, अशी विनंती मला महाराष्ट्रातील जनतेला करायची आहे. निश्चितप्रकारे आपण त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे, असं राजेश टोपे यांनी मांडलं आहे.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.