…अन्यथा अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकू, शिवसेनेचे २५ आमदार नाराज ?

मुंबई : महाविकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात तीन पक्षांचं सरकार आलं असलं तरी अनेकदा त्यांच्यातील वाद उघडपणे समोर येत असतात. भाजपाकडूनही वारंवार तीन चाकांची रिक्षा असा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात असते. तिन्ही पक्षांचे नेतेही अनेकदा एकमेकांविरोधात वक्तव्यं करत आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडत असतात. त्यातच आता शिवसेनेचे २५ आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे २५ आमदार हे निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना निधीवाटपात मतभेद होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या काही आमदारांनी जाहीरपणे पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर या आमदारांची समजूत काढण्याची जबाबादारी उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे.

प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, वैभव नाईक यांच्या नेतृत्वात हे आमदार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी देण्यात आले आहेत त्यात काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ९०० कोटी रुपये, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ७०० कोटी रुपये तर शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांसाठी केवळ ३०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. आधीही अन्याय सुरू होताच आता पुन्हा तोच प्रकार होणार असेल तर आम्ही अर्थसंकल्प सादर होताना विधानसभेत बसणार नाही. सभागृहाच्या लॉबीत किंवा बाहेर विधानभवनच्या पायऱ्यांवर बसू असे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे.