समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्या मुस्लीम नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई – मुस्लिम नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईत शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि नंतर ते म्हणाले की, केंद्र सरकारने समान नागरी संहिता (यूसीसी) लागू केल्यास त्याचा परिणाम फक्त मुस्लिमच नव्हे तर सर्व समुदायांवर होईल. शिष्टमंडळातील एक सदस्याने ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना यूसीसीची जोरदार बाजू मांडली आणि म्हणाले की या संवेदनशील मुद्द्यावर मुस्लिमांना भडकवले जात आहे. ठाकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळाचा भाग असलेले ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) चे सदस्य मौलाना मेहमूद दरियाबादी (Maulana Mehmood Dariyabadi) म्हणाले की ते या विषयावर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष (भाजप) नेत्यांनाही भेटणार आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले की, भारतात विविध समुदायांमध्ये 300 हून अधिक वैयक्तिक कायदे आहेत. यूसीसी लागू झाल्यास या सर्व कायद्यांवर परिणाम होईल आणि विविध समुदायांनाही त्याचा फटका बसेल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले, आम्ही सर्वांसाठी समान नागरी संहितेचे स्वागत करतो पण त्याचा हिंदूंवर विपरीत परिणाम होणार नाही का? जर ते (भाजप) देशभरात गोहत्या बंदीची अंमलबजावणी करू शकत नसतील तर यूसीसीची अंमलबजावणी कशी होणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.