हे बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं, भाजप-शिवसेनेची भूमिका काय? INDvsPAK सामन्यावरुन मनसेचा सवाल

आयसीसीने क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक (ICC ODI World Cup 2023 Schedule) जाहीर केले आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे आणि त्यांची लढत 15 ऑक्टोबरला कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे. आता या सामन्यावरुन विरोध सुरू झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने (MNS) पाकिस्तानच्या भारतातील सामन्याला विरोध केला आहे.

मनसे नेता संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करुन लिहिले की, “भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे मा. बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये व्हावा हे तर पटूच शकत नाही. यावर भाजप आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे? उबाठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे.”