‘सरकारने फडणवीसांना हात लावला, तर आम्ही महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही’

बुलढाणा  : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.

या सर्व प्रकारानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. यातच आता आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी राज्य सरकारला दिलेले एक इशारा चांगलाच चर्चेत आला आहे.  राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसला जाळून त्यांच्या कृतीचा आम्ही निषेध करत आहे. महाविकास आघाडी सरकारला आम्ही इशारा देतो की, आज आम्ही नोटीस जाळली जर का सरकारने फडणवीसांना हात लावला, तर आम्ही महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी दिला.

फडणवीसांनी बदल्यांच्या घोटाळ्यामध्ये पोलिसांचा समावेश आहे, त्याचे पुरावे सर्वांसमोर आणले आहेत. सरकारने या घोटाळ्यांची आणि या घोटाळ्यामध्ये जे समाविष्ट आहेत, त्यांची चौकशी करायला पाहिजे होती. पण ज्यांनी घोटाळा बाहेर काढला आणि पुरावे मांडले, त्यांचीच चौकशी सरकारने सुरू केली आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा बोगस कामांना आम्ही भिणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देश देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे, असे आकाश फुंडकर म्हणाले.