‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

AB De Villiers : आयपीएल 2024 पूर्वी (IPL 2024) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कॅम्पमध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवल्याने चाहते संतापले आहेत. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आयपीएल 2024 साठी त्यांचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहितला (Rohit Sharma) काढून टाकल्याने चाहते निराश झाले आहेत.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल नेटवर्किंग खात्यांवर लाखो फॉलोअर्स गमावले आहेत. मात्र, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची नकारात्मक प्रतिक्रिया पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स आश्चर्यचकित झाला आहे. डिव्हिलियर्स मुंबई इंडियन्सला जवळून फॉलो करतो.

तो म्हणाला, ‘चाहत्यांच्या प्रतिक्रिया नकारात्मक आहेत. हार्दिक हा मुंबईचाच खेळाडू आहे, कारण त्याने त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली होती. तो त्यांच्यासाठी वर्षानुवर्षे खेळला आणि या फ्रँचायझीसाठी त्याच्या पदार्पणाच्या डावात त्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली. मला माहित आहे की जेव्हा हार्दिकने पुढे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सूर्या आणि बुमराह मुंबई फ्रँचायझीशी एकनिष्ठ राहिले, पण आता तो परत आला आहे.’

डिव्हिलियर्स म्हणाला, ‘मला चाहत्यांची नकारात्मक प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटते. मी वाचत आहे की मुंबई इंडियन्स फ्रँचायझी आपले चाहते गमावत आहे आणि रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवल्यामुळे लोक नाराज आहेत. हार्दिक दोन वर्षे गुजरात टायटन्ससोबत होता. 2022 मध्ये कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात त्याने संघाला विजय मिळवून दिला. त्याचवेळी गुजरातचा संघ 2023च्या आयपीएलमध्ये उपविजेता ठरला होता. आता हार्दिक 2024 च्या आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या वर्षी कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे, पण यावेळी संघ मुंबई इंडियन्सचा असेल.’

डिव्हिलियर्स म्हणाला, ‘हार्दिक अधिक अनुभव घेऊन परतला याचा चाहत्यांना आनंद झाला पाहिजे. तो स्वागतास पात्र आहे. मला खात्री आहे की जर त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकली तर चाहत्यांना पुन्हा कोणतीही अडचण येणार नाही.’

डिव्हिलियर्स म्हणाला की, ‘काही लोकांनी रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. मला वाटते की बरेच लोक याने आनंदी आहेत आणि बरेच लोक याबद्दल चिंतेत आहेत. काही लोकांनी ते वैयक्तिकरित्या घेतले. रोहितला कधीतरी पुढे सरसावून हार्दिकसाठी जागा निर्माण करावी लागणार हे निश्चित.’

कर्णधार बदलाचे समर्थन करताना दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार म्हणाला, ‘मुंबई इंडियन्ससाठी ही वाईट चाल आहे असे मला वाटत नाही. हे काहीतरी नवीन आहे. रोहितने गेल्या काही वर्षांत खूप यश मिळवले आहे आणि त्याने अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामुळे भारताच्या कर्णधारपदासाठीही त्याच्यावर खूप दडपण असण्याची शक्यता आहे. आता कदाचित त्यांना थोडा आराम करण्याची आणि खेळाचा पुरेपूर आनंद घेण्याची वेळ आली आहे. आता त्याला दबाव आणि जबाबदारी दुसऱ्यावर द्यायची असेल.’

महत्वाच्या बातम्या-

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप करून काही अर्थ नाही, समंजसपणे हा प्रश्न मार्गी लावा- जयंत पाटलांचे आवाहन

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही