रामायणात सीतामाईचं तर कलियुगात पक्ष चिन्हाचं अपहरण- खासदार अमोल कोल्हे

Amol Kolhe On Shri Ram: सध्या देशात राम मंदिराची चर्चा सुरू आहे. अनेकजन त्याबाबत विधानं करत आहेत. काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारीच आहे असे म्हणतात. त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत, तेवढेच आमचे आहेत. चार खांद्यावरून नेताना आम्हीही जय राम श्री राम, जय जय राम म्हणतो. पण आमच्या मंदिरातील श्रीरामचंद्र हे धनुष्यबाण ताणलेले नाहीत. तर ते आशीर्वादाचा हात उंचावलेले, माता सीतामाई, बंधू लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह कुटुंबवत्सल प्रभू श्रीरामचंद्र आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी शिर्डी येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना म्हटले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागात माणसाला माणूस भेटला तर राम राम म्हणतो. राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो. राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे. प्रभू श्रीरामाविषयी जेव्हा आम्हाला शिकवलं जातं, तेव्हा एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही. पण एकबाणी आणि एकवचनी या तत्त्वांबाबत बोलले पाहीजे. निवडणुकीच्या आधी वचनं द्यायची आणि मग चुनावी जुमला असल्याचं सांगून टाळायचं, अशांना प्रभू श्रीराम कसे पावतील? आमच्या प्रभू श्रीरामांनी लंकेला जाऊन सीतामाईंना सोडवून आणलं, स्त्रीचं रक्षण करणारे श्रीराम होते. पण आमच्या महिला कुस्तीपटूंवर काय वेळ आली, ते देशाने पाहिलं. महिला कुस्तीपटूंना जर कुस्तीलाच राम राम ठोकावा लागत असेल आणि सत्ताधारी महिलांचे शोषण करणाऱ्यांना आश्रय देत असतील तर त्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? असे काही प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केले.

अमोल कोल्हे म्हणाले की, सीतामाईचे हरण झाले, तेव्हा कांचनमृग होता. त्याच्यापाठी धावत असताना सीतामाईंचे अपहरण झालं. आता कांचनमृगाचे रुपडं बदललं आहे. कांचनमृगाने सोन्याचं कातडं नाही तर ५० खोक्यांचं जॅकेट घातलंय आणि जसं मृगाच्या बेंबीत कस्तूरी असते, तशी ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाकडून वाचण्याची कस्तूरी या नव्या कांचनमृगाकडे आहे. रामायणात सीतामाईचं अपहरण झालं होतं, कलियुगात पक्ष आणि चिन्हाचं अपहरण होत आहे, असे मला नारायणगावमधील परिचित व्यक्तीने सांगितले. मी त्यावर त्यांना म्हणालो, नुसतं पक्ष आणि चिन्हाचं नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचंही अपहरण झालं आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले आहे.

इतिहासात आपण जेव्हा डोकावतो त्यावेळी शिवाजी महाराज यांच्याशिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यावेळी प्रत्येकाला आपली वतन वाचवायची होती. त्यामुळे सगळ्यांनी आदिलशहा पुढे मान झुकवल्या होत्या. त्यावेळी केवळ शिवाजी महाराज यांच्याकडे निष्ठावान मावळे होते. इतिहासाची पुनरावत्ती बघा. राज्यातील अनेक प्रकल्प गेले मात्र राज्यांतील एकाही नेत्याला दिल्लीसमोर मानवर करून बोलण्याची हिंमत नाही. कारण त्यांनी माना झुकावल्या आहे. आपण लक्षात घ्यायला हवं की, शरद पवार साहेब आपल्याकडे आहेत आपण स्वाभिमानाची लढाई लढत आहोत. आपण ही लढाई का लढत आहोत याचं कारण आपल्याकडे आहे. आपल्याकडे ताकद कमी आहे यंत्रणा कमी आहे. मात्र हरकत नाही. नाण्याची दूसरी बाजू लक्षात घ्यायला हवी. आपण जे करु शकतो किंवा निर्णय घेऊ शकतो ते भाजपच्या निवडून आलेल्या खासदारांच्या हातात नाही. सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटापेक्षा स्वतंत्र राहणारा फांदीवर बसून गाणारा पोपट महत्त्वाचा असतो असे खासदार अमोल कोल्हे म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात