‘ज्याला अयोध्येला जायचंय त्याने एवढा बोभाटा कशाला करायचा ?’ 

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद (Press confrance)  घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला (Ayodhya) जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

दरम्यान, आता राज ठाकरेंच्या अयोध्या वारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)  यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कोणी अयोध्या वारी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला जायचेय त्याने एवढा बोभाटा कशाला करायचा. आम्ही काहीतरी वेगळे करून दाखवतो हे प्रयत्न सुरु आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत मराठी माणसांना एकत्र केले. आम्ही तेव्हा विरोधात बसलो होतो. ते मराठी लोक आपल्यासोबत यावेत यासाठी कोणाला उत्साही आरती करावीशी वाटते, काही घोषणा कराव्या लागतात. आम्हीही काल आरती केली, परंतू त्यातून आम्ही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही निवडणुकीत योजना मांडू, विकासकामे केलीय त्यावर मते मागू, असे अजित पवार म्हणाले.