घाईघाईने मधुचंद्र केला, पण लग्न करायचे विसरले ; शिंदेंना शिवसेनेचा टोला

Mumbai – राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत असून आज दैनिक सामना मधून देखील पुन्हा एकदा शिंदे गटावर शरसंधान करण्यात आले आहे. शिंदेच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या ‘चाळीस’ जणांसाठी चिंताजनक आहे. असं सामानात म्हटलं आहे.

घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्न करायचे विसरलो, अशी अवस्था शिंदे गटाची झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरु झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो, असा टोमणा शिवसेनेनं शिंदे गटाला मारला आहे.

शिंदेच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या ‘चाळीस’ जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या ‘डायरिया’मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान 20 ते 22 तास न झोपता काम करतात, असे अग्रलेखात म्हटलं आहे.