“पीएचडी करुन काय दिवा लावणार?”; विधान परिषदेत अजित पवारांचं अचंबित करणारं वक्तव्य

Ajit Pawar Statement On PHD Student: विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवर सभागृहात चर्चा होत आहे. विविध विधेयकं, प्रस्ताव मांडले जात आहेत. अशातच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक विधान केले आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू असताना सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. यावरून अजित पवार, पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान करत टीकेचे धनी ठरले आहेत.

पीएचडी करू इच्छिणारे विद्यार्थी आशेवर होते की त्यांना सारथीकडून फेलोशिप मिळणार आहे, असं सतेज पाटील म्हणाले. यावर अजित पवार म्हणले, फेलोशिप घेऊन ते काय करणार आहेत? त्यावर सतेज पाटील म्हणाले, हे विद्यार्थी पीएचडी घेतील. पाटील यांचं उत्तर ऐकल्यावर अजित पवार म्हणाले, पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत? त्यानंतर सते पाटील म्हणाले, दादा असं काय म्हणताय तुम्ही, या योजनेमुळे राज्यातील पीएचडीधारकांची संख्या वाढेल.

केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार अशी अट तुम्ही (राज्य सरकारने) नंतर लावली. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याआधी तुम्ही हे सांगायला हवं होतं. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली, तुम्ही कट ऑफ डेट जाहीर केली आणि आता राज्य सरकार केवळ २०० फेलोशिपची अट ठेवत आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. तसेच आमची मागणी आहे की, तुम्ही ही अट पुढच्या वर्षीपासून लागू करा, असंही सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटलांच्या मागणीवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आम्ही यावर फेरविचार करू. त्यांची मागणी मान्य होईल असं सांगता येत नाही. गरजेचं असेल तर सहानुभूतीपूर्वक विचार करू. मला असं वाटतं की, या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह, आयएएस, आपीएस, आयआरएस, आयएफएससह इतर स्पर्धा परिक्षांमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. यंदा एमपीएसी, यूपीएससीत आपल्या पोरांनी मोठं यश मिळवलं. या परिक्षांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, खारघर (नवी मुंबई) आणि नाशिकमध्ये आपण सारथीचं केंद्र उभं करणार आहोत.

महत्वाच्या बातम्या-