बंदा ये बिनधास्त है : अजितदादांनी ‘या’ प्रसंगी मविआच्या भूमिकेपेक्षा मांडली आहे वेगळी भूमिका 

Ajit Pawar  :  राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष आणि आघाडी (महाविकास आघाडी) पासून दूर जात विधान केले आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विरोध केला, तसेच शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला, तर दुसऱ्याच दिवशी (२९ मे) अजित पवार यांनी वेगळे मत व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, 135 कोटींच्या पुढे गेलेली देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन लोकसंख्याही वाढेल. त्यामुळे संसदेच्या या नव्या इमारतीची गरज होती असे मला व्यक्तिश: वाटते.आता या नवीन इमारतीत सर्वांनी संविधानानुसार काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.

दरम्यान, अजित पवार यांनी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे असे नाही. यापूर्वी देखील त्यांनी उघडपणे आपली वेगळी भूमिका मांडली आहे.सत्तासंघर्षावरून महाविकास आघाडीने रान पेटवले होते त्यावेळी शिवसेनेने (यूबीटी) नैतिकतेच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. यावर अजित पवार यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेपेक्षा (यूबीटी) वेगळे मत व्यक्त केले आणि शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले. शिंदे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत, हे माहीत असल्याचं ते म्हणाले होते.

यानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार असा दावा विरोधक करत असताना उघडपणे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. 16 आमदार अपात्र झाले तरी शिंदे सरकार पडणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. इतक्या आमदारांना अपात्र ठरवल्यानंतरही सरकार विधानसभेतील बहुमत गमावणार नाही, असे ते म्हणाले होते.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते, ठाकरे गट आणि कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे मागे घेण्याची मागणी केली. पवार यांच्या राजीनाम्याची घोषणा होताच अजित पवार यांनी शरद पवार आपला निर्णय मागे घेणार नसल्याचे सांगितले होते. यासोबतच कार्यकर्त्यांना काळजी करू नका, असे आवाहन करत जो कोणी नवा अध्यक्ष होईल, त्याच्या पाठीशी असल्याचे सांगितले. समितीचा निर्णय मान्य असेल, असे ते म्हणाले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांना राजीनामा देण्याचा निर्णय बदलावा लागला आणि अजित पवार हे तोंडावर पडले असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही.