अमोल कोल्हे यांचे थेट पोलिसांवरच आरोप; जाणून घ्या नेमके प्रकरण काय आहे ?

पुणे – छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांवर केला आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावरून अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं. अमोल कोल्हे म्हणाले, “मोफत तिकीट मागणाऱ्या प्रवृत्तीला मी एवढंच सांगतो की, इथं बसलेले सर्वजण कराचे पैसे देतात आणि त्या करातून पोलिसांना महिन्याचा पगार मिळतो. असं असूनही छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी हे मोफत तिकिट मागतात. तसेच मोफत तिकिट दिलं नाही, तर नाटक कसं होतं ते बघतो असं म्हणतात.”

“माझी हात जोडून विनंती आहे की, पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. २६/११ च्यावेळी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं, कोविड काळात ज्यांनी प्राणांची पर्वा न करता रस्त्यावर होते. त्यामुळे इथं बसलेल्या त्या पोलीस बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा पोलीस दलाच्या उज्वल परंपरेला शुल्लक कारणासाठी गालबोट लावू नका. मी जाणीवपूर्वक तुमचं नाव घेत नाहीये,” असंही अमोल कोल्हेंनी नमूद केलं.

अमोल कोल्हे यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील उल्लेख केला. त्यांना देवेंद्र फडणवीस यांना धमकी देणाऱ्या पोलिसांना समज देण्याचं आवाहन केलं. वर्दी ही जबाबदारीची असते. याची जाणीव ठेवावी, असं अमोल कोल्हे यांनी ठणकावून सांगितलं.

https://youtu.be/KsMLr86SMDQ