शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे ‘जॉनी लिव्हर’, त्यांची ही शेवटची टर्म – मिटकरी 

Akola – शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होणार, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता अमोल मिटकरींनी त्यांच्या शैलीत उत्तर देत शहाजी पाटलांवर पलटवार केला आहे. ते शिंदे गटाचे ‘जॉनी लिव्हर’ आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी शहाजीबापूंवर केली आहे. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शहाजी पाटील (Shahaji Bapu Patil) हे करमणुकीचं पात्र आहे. शिंदे गटाचे जॉनी लिव्हर, या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. त्यामुळे त्यांनी माझी काळजी न करता शिंदे गटात त्यांची कशी ओढाताण सुरू आहे, याची काळजी घ्यावी, असा टोला आमदार मिटकरींनी (Amol Mitkari) लगावला आहे.

शिंदे गटात तुम्ही सध्या कितीही डायलॉगबाजी केली. तरी तुम्हाला कॅबिनेट तर सोडा साधं राज्यमंत्री हे पदही भेटणार नसल्याचं मिटकरी म्हणाले. ही शहाजीबापूंची शेवटची टर्म असल्याचा टोला आमदार मिटकरींनी लगावला आहे.