पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार ‘राम-लखन’ची जोडी! ‘या’ कॉमेडी सिनेमात दिसणार एकत्र

मुंबई- अनिल कपूर (Anil Kapoor) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) स्टारर ‘राम लखन’ हा नव्वदच्या दशकातील सर्वात आयकॉनिक चित्रपटांपैकी एक होता. सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यासोबतच या दोघांनी इतरही अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले होते. मात्र जॅकी श्रॉफ-अनिल कपूरने एकत्र स्क्रीन शेअर करून बराच काळ लोटला आहे. मात्र आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर हे दोघेही सुभाष घईसोबत ‘चोर पोलीस’ नावाच्या कॉमेडी चित्रपटात काम करू शकतात. याबाबत दोघांशी चर्चा सुरू आहे. एका सूत्राने पिंकविलाला सांगितले आहे की- हा एक कॉमिक चित्रपट आहे, ज्यामध्ये अनिल कपूर चोरांच्या कुटुंबातील आणि जॅकी श्रॉफ पोलिसांच्या कुटुंबातील असतील. या चित्रपटात दोघांची जबरदस्त केमिस्ट्रीही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे.

अनीस बज्मी लिहित आहेत फिल्मची कहाणी
सुभाष घई यांच्या या सिनेमाची कथा अनीस बज्मी आणि पट्टू पारेख यांनी लिहिली असल्याची समजत आहे. पोलिस आणि चोरांच्या कुटुंबावर आधारित हा विनोदी चित्रपट आहे. दिग्दर्शकपदासाठी रवी जाधव यांच्याशी बोलणी सुरू आहे. चित्रपट सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात होऊ शकते. सूत्राने सांगितले की स्क्रिप्ट तयार असून दिग्दर्शक आणि स्टारकास्टवर काम सुरू आहे.

माध्यमांतील वृत्तांनुार, अनीस बज्मीचा हा एक टिपिकल चित्रपट आहे, ज्यात पोलीस, चोर, कुटुंब आणि एक प्रेमकथा असेल. मुख्य कलाकार आणि इतर कलाकारांच्या नावावरही लवकरच शिक्कामोर्तब होईल. यासाठी स्टुडिओ पार्टनरही असेल. सुभाष घई या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटाबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.