आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही, आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी – प्रकाश आंबेडकर

मुंबई- काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये युती झाली. या युतीनंतर राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत महाविकास आघाडीचा घटक आहे. त्यामुळे या युतीवरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीबद्दल मोठे विधान केले आहे.

आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार हे आजही भाजपासोबत आहेत, असा धक्कादायक दावाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.

माझा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझा विश्वास कुणावर नाही असं नाही. जिथे जुळायचं असते तिथे १०० टक्के जुळले पाहिजे. बघायचं लेफ्टकडे आणि हात टाकायचा राईटकडे अशी जी व्यवस्था असते ती मला चालत नाही. मी महाविकास आघाडीचा अद्याप भाग नाही आणि माझी होण्याचीही इच्छा नाही. माझी युती शिवसेनेशी आहे. शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे हा त्यांचा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच महाविकास आघाडीचा आमचा काही संबंध नाही. त्यामुळे निर्णयाचा संबंध नाही. मी कुणाच्या निर्णयाची प्रतिक्षा करत नाही. २०२४ विधानसभा निवडणुकीपर्यंत ज्या निवडणुका येतील त्या सगळ्या ठाकरे शिवसेना आणि आम्ही एकत्रित लढणार आहोत. ज्याने त्याने कोण कोणासोबत आहे हे पाहावं. मैत्री करायची तर ती प्रामाणिक करायचा. समझौता करायचा तर प्रामाणिक करायचा. समझौता करायचा नसेल तर करू नये. प्रत्येकाने आपापली भूमिका घ्यावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

शरद पवार आजही भाजपासोबत
शरद पवारांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्ताचा दाखला दिला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे ठरले होते. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभे आधीच आमचे ठरले होते. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.